एक ना धड
आम्ही दोघे भाऊ अण्णांना घेऊन दिवाळीच्या सुट्टीत मंडणगडला गेलो होतो. ज्या मातीत आम्ही वाढलो, तिला भेटायचे होते. ज्या घरात राहिलो ते छोटेखानी घर आता कोसळायला आले होते. अण्णांचे वय 89 वर्षे, 1972 च्या सुमारास त्या घरात सात वर्षे काढली होती. पडवीत खडूंनी लिहिलेले नाव अजूनही होते. मातीची चूल तीच होती. नंतर कुणी राहीलेच नव्हते. कोकणातलं मातीचं जांभ्या दगडांचं ते छोटसं घर. त्याच्या मागे परसात आम्ही भाजीपाला लावत होतो. पुढच्या अंगणात झेंडूची आणि टपक्याची झाडे लावायचो. अनेक आठवणी तराळत होत्या. त्यावर खरडायला बसलो.
आत्मवृत्त लिहायचे मनात नव्हतेच, कारण तितका मी प्रामाणिक नाही. खर लिहिलं तर आयुष्यभर दावे चालवत बसायला लागेल.
बर मी खरडलेलं तुम्ही का वाचावे? मी काही अटकेपार झेंडे लावलेले नाहीत. मी परिपूर्ण वकील नाही. पत्रकारिताही अर्धवट. अभिमान वाटावा असे काही केले नाही. हजार दगडावर पाय ठेवला.
मुसाफिरी कशात केली नाही? सर्वकडे हात मारला नी तोंड पोळून घेतले.
राजकारणात गेलो खासदारकीचे तिकीट मिळेपर्यंत मजल मारली. ‘सामना’ करिता दिल्ली प्रतिनिधित्व केले. राष्ट्रपतींबरोबर कॉफीपान केले. पंतप्रधान व्हायच्या आदल्या सायंकाळी नरसिंहराव साहेबांच्या सोबत गप्पा मारल्या. मुंबर्इत मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्रीपदाचा ताबा घेतला, तेव्हा बाजूला उभा राहून त्यांना पेढा भरवला. गणेश नार्इकांनी पक्ष सोडला तेव्हा त्यांच्या डोळयातल्या अगतिकतेच्या भावना वाचल्या.
...2...
भुजबळांसोबत पक्षातली शेवटची सभा गाजवली. रेडिओवर ‘कॉफी शॉप’ केले. दूरदर्शनवर ‘चक्रव्यूह’ केले. कॉलेजला असताना प्रिन्सीपॉलना घेराव घालून उन्हात उभे ठेवले. पुढे त्यांनीच मायेने घर उघडून अभ्यासाला बसवले. एका मोठया माणसाला डोळयांदेखत जाताना प्रथम पाहिले. तो मृत्यू अनुभवला. पक्ष्यांची आवड नसली, तरी पक्षी घेतले, पण बंद गाडीत ठेवल्याने ते तडफडून मेले. इमू पक्षी पाळले, पोल्ट्री टाकली. नर्सरी चालवली, विश्रामगृहसुद्धा चालवले. नदी नाल्यात डुबलो, विहिरीत बुडताना वाचलो. स्वत:चे स्विमींग पूलमध्ये मस्तीत तरंगलो. झोपडीत पूरग्रस्तांपर्यंत पोचलो. रात्रभर चपात्या भाजून घेतल्या. पोशाखी एनजीओवाले हायवेवर असताना बारा किलोमीटर खांद्यावर टोप घेऊन डोंगर पायथ्याशी जेवण पोहचविले.
विटी-दांडू खेळलो, लगोरी उडवली, गाडा फिरवला. आंब्याला डोंगळा लावला. शेंगा चोरून पोपटी लावली, आणि परदेशी जाऊन कॅसिनोतही पैसे उडवले.
कवीवर्य सुरेश भटांची दुसरी बाजू सहन केली. शेवटच्या काळात त्यांची खाण्याची वखवख आणि प्रतिभेतला कैफ एकाच वेळी पाहिला. पाडगावकरांचा साठावा वाढदिवस पडक्या पोल्ट्रीत कोंबडयांच्या सानिध्यात साजरा केला. मोजून दहा डोक्यांसमोर मित्राचा कवितासंग्रह प्रसिद्ध होताना हळहळलो. चार लाखांच्या नाना धर्माधिकार्यांच्या सभेतही लोकांच्या मानसिकतेवर हसलो. नारायण राणेंसारख्यांना दोन तास बाहेर ताटकळत ठेवून बाळासाहेबांसोबत गप्पात रंगलो. आणि उध्दवजींचे सारथ्य करीत त्यांचेशी वादही घातला. तळमळीच्या कार्यकत्र्याचे रक्त
...3...
ओघळताना पाहून हतबल झालो. आणि खुन्याचा बदला घेतल्यावर हसत हसत माझे घराची झडती घेऊन दिली.
वकिलीत नायब तहसीलदारचीसुद्धा पायरी झिजवली आणि सुप्रीम कोर्टालाही विनंतीवरून खून खटल्यातील महत्वाचे कागद, फोटो शोधून दिले. सुटणार असे वाटणार्या केसमध्ये जन्मठेपेची शिक्षा घेतली आणि फासावर लटकतील, अशा वार्इट केसमध्ये आरोपीला जीवापार मेहनत करून बाहेर काढले. वकिलीत, नवर्याचा खून झाल्यावर व्रत म्हणून मुलीला जिद्दीने डॉक्टर करणारी पतीव्रता पाहिली. आणि व्यभिचार रिचवण्यासाठी सात महिन्याच्या पोरीचे नरडे दाबणारी वैरिणीसुद्धा पाहिली. केवळ पैशातच नाती मोजणारी पक्षकार पाहिली. आणि कोर्टात एकमेकांच्या जीवावर उठलेले पण घरी एका ग्लासात पिणारे काका पुतण्या पाहिले. आर्इची अब्रु वाचवताना खून करून शिक्षेला गेलेला मुलगा पाहिला आणि भाकरीसाठी आर्इचे डोक्यात वरवंटा टाकणारा करंटाही पाहिला.
घरात होळीच्या दिवशी बाप तहसीलदार असताना मिलोच्या भाकर्या खाव्या लागल्या आणि परवडत नाही म्हणून मुंबर्इत लपत छपत बेबॉर्न स्टेडियमवर दोन रुपयाचा आमलेटपावही खाल्ला. लाखो रुपये असूनही जुने दिवस आठवल्यावर कमरेचा पट्टा मॉलमध्ये खरेदी न करता ठेवून दिला. मुलीच्या शिकवणीसाठी हजारो रुपये फी भरली पण स्वत: मात्र शौकत परदेशीच्या मेहरबानीने बारावी झालो. भावाकडे आश्रितासारखा राहिलो, वहिनीचे ममत्व पाहून गहिवरलो. तार्इचे अचानक कुंकू पुसताना ढसाढसा रडलो. आणि कोडगेपणाने
...4...
आर्इला व्याधीतून सोडवले म्हणून देवाचे आभार मानले. साहित्य संमेलन भरवले आणि कोपर्यातल्या खुर्चीत बसून राजकारण्यांनी त्याचे केलेले हायजॅकही पाहिले. आंबाडीचे बाठा टाकून केलेले कालवण भुरकून दाबले. आणि सेव्हन स्टारमधली डीश बेचव म्हणत चमचा आडवा ठेवून बाजूलाही सारली.
वीस वीस वर्षे फुकट केस लढून ऐनवेळी पाठ फिरवणारे गावकरी पाहिले. आणि वीस वर्षांनीही आठवणीने वकिलीच्या पाया पडणारे पक्षकार अनुभवले. निवडणुकीत लाखो रुपयांचा व्यवहार सांभाळला. कलेक्टरच्या कानफटात वाजवताना साक्षीदार बनलो आणि अनेक व्हीआयपीच्या मांडीला मांडी लावून बसलो. रोज भेटून आपले कोण आणि परके कोण हे समजू शकलो नाही. आणि पहिल्याच भेटीत आपलासा झालेल्या एका समाज सेवकांच्या मृत्यूची बातमी दुसर्याच दिवशी पेपरात वाचली.
चित्रे काढली, शेती केली. जगभर फिरलो, तरी चौलची सकाळी नारळाची पाती जळल्यावर येणारा सुगंध विसरलो नाही. अपयश गिळून गिळले आणि यशही पचवले.
लौकीकाथीने जीवन जगलो. माणसे वाचायला शिकलो!
लिहायचे मनात आल्यावर खरेपणालाच घाबरलो. एका भल्या माणसांने लिहिण्याचा सल्ला दिला म्हणून असे बरगळत सुटलो.
जे घडले ते खाज म्हणून छापून घेतले आणि तुमचेसमोर ठेवले.
...5...
हे आत्मवृत्त अजिबात नाही. अनुभवकथनही नाही, ही तर केवळ नसती उठाठेव!
तुम्हाला बुंचकळयात टाकणारी, तुमच्या आजुबाजूला दिसणार्या एका मुसाफिराची ही कहाणी.
वाचताना बधीर व्हाल असा दावा नाही पण आवडलं तर दुसर्याच्या कानावर नक्की घाला. खटकलं तर मला नक्की कळवा.
कारण हे सर्व म्हणजेच,
एक ना धड..........
गुड
ReplyDeleteVery nice sir ...khup Chan Aatmakathan kelay sir ..slaute to You.
ReplyDelete